युवराजने सांगितला ‘त्या’ सहा षटकारांचा ‘राज’

मटा ऑनलाइन वृत्त । दिल्ली

प्रत्येक नावजलेल्या क्रिकेटपटूच्या जीवनाशी अशी एक खेळी जोडलेली असते की त्याचं नाव उच्चारलं की ती खेळी सहज आठवते. युवराज सिंग नाव घेताच त्यानं एकाच षटकात ठोकलेल्या सहा षटकारांची आठवण येते. याच सहा षटकारांचं गुपित युवराजनं एका टीव्ही शोमध्ये उघड केलं.

युवाराजनं २००७ मधील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचत इतिहास रचला. जणू एखाद्याचा बदला घ्यावा अशाच भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. त्याचा चेहरा गंभीर आणि नजर चेंडूवर पक्की बसली होती. आलेला प्रत्येक चेंडू विना अडथळा सीमापार करायचा अशाच पद्धतीने तो फटके लगावत होता. युवराजच्या या तडाखेबंद खेळीला करणीभूत होती फ्लिंटॉफनं केलेली शेरेबाजी.

तुला चांगले फटके खेळताच येत नाही, तू अत्यंत वाईट खेळतोस, असं फ्लिंटॉफ युवराजला म्हणाला. त्यावर युवराजनेही फ्लिंटॉफला मूर्ख म्हटलं. यावर फ्लिंटॉफ अधिक चिडला आणि तुझा गळाच कापू अशी भाषा वापरली. युवराजही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं फ्लिंटॉफला आपल्या हातातील बॅट दाखवली आणि म्हणाला, तुला माहित आहे मी तुला याच बॅटीनं मारेन. या वादावादीनंतर स्टुअर्ट गोलंदाजी करण्यास आला आणि सलग सहा षटकरांसह युवराजनं फ्लिंटॉफटचा सारा राग काढला.

या सामन्यात भारतानं इंग्लंडला १८ धावांनी पराभूत केलं होतं आणि टी-२० वर्ल्ड कप देखील जिंकला होता.