‘मोदींचा सूट शिवण्यासाठीच शिष्यवृत्त्या बंद’

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं शिक्षणावरील आर्थिक तरतूद कमी केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यृत्त्या बंद केल्या आहेत. हे सगळं करून सरकार काय साधणार आहे,’ असा सवाल करतानाच, ‘नरेंद्र मोदींचा सूट शिवण्यासाठीच हे सगळं केलं जात आहे,’ असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाचा नेता कन्हैया कुमार यानं केला.

पुरोगामी संघटनांनी आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कन्हैयाचं भाषण आयोजित केलं होतं. आपल्या भाषणात कन्हैया यानं नेहमीप्रमाणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, ब्राह्मणवाद व हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य केलं. डाव्या विचारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कन्हैयानं भाषणातून समानते व शोषणमुक्त समाजाचा नाराही दिला. श्रोत्यांकडून मिळणाऱ्या टाळ्यांमुळं भान सुटलेल्या कन्हैयांना एकदा-दोनदा ‘मोदींचे थोबाड’ वगैरे शब्दही वापरले. अनुपम खेर, योगगुरू रामदेव बाबा यांच्यावरही कन्हैयानं टीका केली.

कन्हैया काय म्हणाला…

> पुणे ही नथुराम गोडसेची भूमी असेल, तर ती दाभोलकरांचीही आहे. महाराष्ट्राची भूमी जातीयवाद आणि हिंसेची प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. पण सत्याचाच विजय होईल.

> शोषणाचा विरोध व्हायला हवा हे आमच्या पिढीला आता कळले आहे. त्यामुळं रोहित कधी मारणार नाही. नवे रोहित जन्माला येतील. लढाई सुरूच राहील.

> शिक्षण, पोलीस अशा सर्व क्षेत्रांचे कंत्राटीकरण झाले आहे. आता फक्त संसदच तेवढी बाकी राहिली आहे. तिचेही कंत्राटीकरण करून टाका.

> पंतप्रधान मोदी तंत्रज्ञानाच्या गोष्टी करतात. पण, तंत्रज्ञानाने आणलेल्या सुविधा फक्त ठराविक लोकांनाच मिळाल्या. त्यांचं सार्वत्रिक समान वाटप कधी होणार? हे तंत्रज्ञान जरा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवा.

> आपल्या देशात धर्मावरून होणाऱ्या दंग्यांपेक्षा जातीय हिंसाचारात अधिक लोक मारतात. कामगार मारतो, तेव्हा त्याची बातमी होत नाही. पण मोदी परदेशात गेले की मात्र बातमी होते. हे काय सुरू आहे?

> मोदी सरकारच्या काळात अनेक विद्यापीठांचे कुलगुरू हे फक्त ‘पोस्टमन’ बनून राहिलेत.

> इथला समाज आधीपासूनच दुभंगला आहेच. पण भुकेचा प्रश्न आला की लोक एकत्र येऊन रस्त्यावर उतरतात. हे तुम्हाला कधीतरी हे समजून घ्यावेच लागेल.

> एकदाही न भेटताच मी आणि रोहित एकमेकांना ‘भेटलो होतो’. आम्ही एकमेकांना जाणलं होतं. ही भेट समान विचारांची होती!

> पूर्वी भारतमाता हातात तिरंगा घेऊन असायची. आज भारत मातेच्या हातात भगवा आहे. आज हे ‘भारतमाता की जय’ म्हणतील, उद्या जय माता दी म्हणायला लावतील. यात ब्राह्मणवादाची मूळे दडली आहेत.

> ‘माता’ म्हणायला आमची हरकत नाही. पण मोदीजींनी कधीतरी रोहित वेमुलाच्या आईलाही जाऊन भेटले पाहिजे. आपल्या देशातील मानवता आणि संवेदना संपली आहे का?

> आज देशात प्रचंड दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्या करताहेत. दलितांना, महिलांना अत्याचारांना सामोरं जावं लागतंय. आणि तुम्ही येताजाता ‘राष्ट्रद्रोही’, ‘नक्षलवादी’, असे स्टिकर विकत बसले आहेत. ही तर ‘अब की बार, फोटोशॉप की सरकार’ आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट