आयला! आपल्या सचिनचा ‘जबरा फॅन’ सापडला

अनुश्री पवार, कॉलेज क्लब रिपोर्टर

आपला आदर्श, स्फूर्तीस्थान असलेल्या व्यक्तीसाठी काहीतरी हटके करावे असे कट्टर चाहत्याला वाटत असते. भारतरत्न सचिन तेंडुलकरला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा चाहता अभिषेक साटमने असेच खास गिफ्ट दिले. तिसरीत असल्यापासून अभिषेक सचिनचा चाहता आहे. ही सचिनभक्ती पाहून त्याच्या मावशीने त्याला सचिनच्या आठवणींचे कलेक्शन करण्याची कल्पना सूचवली. तेव्हापासूनच त्याने सचिन संबंधित प्रत्येक वस्तू जमा करण्यास सुरवात केली. फोटोंपासून सुरू झालेल्या या जमापूंजीत आज सचिनचे विविध लेख, पुस्तके व मासिकांचाही समावेश आहे.

सचिनचा सामना पाहिला की अभिषेक दुसऱ्या दिवशी मुंबईतील आघाडीची वृत्तपत्रे विकत घेऊन सचिनची कात्रणे गोळा करायचा. याबरोबरच सचिनवरील पुस्तकांचा ठेवाही अभिषेककडे आहे. अभिषेककडे आज तब्बल ३०,०००हून अधिक सचिनचे फोटो, १५००० हून अधिक सचिनवर लिहिलेले लेख आहेत तर २०० हून अधिक मासिके आणि सचिनच्या आयुष्यवरील ३० पुस्तकं आहेत. इतकच नव्हे तर या ‘सचिन कलेक्शन’मध्ये खुद्द सचिनची सही असलेली २४ कॅरेट गोल्ड प्लेटेड बॅट, रेनॉल्डच्या ११ पेनांचं कलेक्शन ज्यावर सचिनच्या दोन फोटोंसोबत त्याच्या प्रत्येक षटकाराची माहिती व सही सुद्धा दिसते. सचिनच्या या वाढदिवसानिमित्त अभिषेकच्या मित्रांनी त्याच्या या संपूर्ण प्रवासावर ‘आयला फॅन’ हा व्हिडियोही बनवलाय.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट