कन्हैया कुमारच्या सभेमुळं शेतकऱ्यांचं नुकसान

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाचा नेता कन्हैया कुमार यानं पुण्यात मोदी सरकारवर टीका करत गरीब, वंचितांच्या दुर्दशेबद्दल चिंता व्यक्त केली खरी, पण त्याच्या या सभेमुळं पुण्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

जेएनयूतील देशविरोधी घोषणाबाजी आणि त्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईमुळं प्रकाशात आलेला कन्हैया कुमार सध्या देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात भाषणे देत आहे. मुंबईतील कालच्या भाषणानंतर आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कन्हैयाचं भाषण झालं. बालगंधर्व रंगमंदिरात सध्या आंबा महोत्सव भरला आहे. गावोगावच्या शेतकऱ्यांनी या महोत्सवात आपले स्टॉल टाकले आहेत. रविवारी व सुटीच्या दिवशी या महोत्सवास प्रचंड गर्दी होत असते. आजही रविवार असल्यामुळं शेतकऱ्यांना चांगल्या विक्री आशा होती. मात्र, कन्हैयाच्या सभेमुळं शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. कन्हैयाच्या सभेत कसलीही गडबड होऊ नये म्हणून आज बालंगंधर्व रंगमंदिराचे गेट बंद करण्यात आले होते. त्यामुळं अनेक ग्राहकांना आंबा महोत्सवाला हजेरी लावता आली नाही. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट