कन्हैयावर हल्ला झालाच नाही!: मुंबई पोलीस

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाचा नेता कन्हैया कुमार याच्यावर विमानात झालेल्या कथित हल्ला प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. कन्हैया कुमारवर हल्ल्याचा प्रयत्न झालाच नाही, त्याचे आरोप चुकीचे आहेत,’ असा मुंबई पोलिसांनी चौकशीअंती स्पष्ट केलं आहे.

जेएनयूतील देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी अटक करण्यात आलेला व सध्या जामिनावर असलेला कन्हैया कुमार गेल्या काही दिवसांपासून देशभरात सरकारच्या विरोधात भाषणं देत आहे. काल मुंबईत भाषण दिल्यानंतर रविवारी तो जेट एअरवेजच्या विमानानं पुण्याला आला. मात्र, प्रवासादरम्यान एका प्रवाशानं आपला गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांना ट्विटरवरून केला होता. त्याच्या ट्विटनंतर पोलिसांनी मानस डेक्का नामक एका संशयिताला ताब्यात घेतले. डेक्कानं कन्हैया कुमारचे सर्व आरोप फेटाळून लावले. कन्हैयाच्या बाजूच्या सीटवर बसताना त्याला चुकून माझा हात लागला होता, असं त्यानं सांगितलं.

मुंबई पोलिसांच्या चौकशीतही कन्हैयावर हल्ला झाल्याचं आढळून आलं नाही. मुंबईचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनीच ही माहिती दिली. ‘आम्ही कन्हैया कुमारला रीतसर तक्रार नोंदवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानं तसं करण्यास नकार दिला. त्यानंतरही कन्हैया व त्याच्या मित्रांनी केलेल्या आरोपांची पोलिसांनी चौकशी केली. मात्र, त्यांचे आरोप चुकीचे असल्याचं चौकशीतून समोर आलं,’ असं भारती म्हणाले.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट