एक मेपासून एक कर्मचारी एक ईपीएफ खाते 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाहनिधीचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’तर्फे (ईपीएफओ) मुदतीपूर्वीच निधी काढून घेण्याला आळा घालण्यासाठी येत्या एक मे पासून ‘एक कर्मचारी एक ईपीएफ खाते’ प्रणाली राबविण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांकडून बहुतांशवेळा नोकरी सोडताना किंवा बदलताना भविष्यनिर्वाह निधीतील रक्कम काढली जाते. वेळीअवेळी काढल्या जाणाऱ्या रकमेला आळा बसावा, अशी ‘ईपीएफओ’ची इच्छा आहे. दरम्यान, राज्य सरकारांनाही या योजनेशी संलग्न करण्यासाठी ‘ईपीएफओ’ प्रयत्न करीत आहे. ‘ईपीएफओ’च्या विश्वस्तांच्या २१ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत ‘एक कर्मचारी एक ईपीएफ खाते’चा निर्णय घेण्यात आला.

काय फायदा होणार?

पीएफ खातेधारकांना अधिकाधिक सवलती देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे यापूर्वीच ‘युनिव्हर्सल अकाउंट नंबर’ (यूएएन) प्रदान करण्यात आले आहेत. आता ‘एक कर्मचारी एक ईपीएफ अकाउंट’मुळे कर्मचाऱ्यांना आपले खाते नियंत्रित करणे आणखी सोपे होणार आहे. एखादा कर्मचारी नव्या कंपनीमध्ये रूजू होणार असेल, तर त्यासाठीही नवे खाते उघडण्याची गरज भासणार नाही. कर्मचाऱ्याने कंपनी बदलल्यानंतर जुन्या खात्यातून पैसे काढण्यासाठी अथवा हस्तांतर करण्यासाठी फारसे कष्ट पडणार नाहीत.

‘नियम आणखी सुलभ करणार’

‘ईपीएफओ’च्या २१ एप्रिल रोजी झालेल्या अंतर्गत बैठकीला प्रॉव्हिडंड फंड कमिशनर व्ही. पी. जॉय उपस्थित होते. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यासाठी आणि निधी काढून घेण्यामध्ये अथवा हस्तांतर करण्यामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सुयोग्य प्रणालीची निर्मिती करण्यावर जॉय यांनी जोर दिला. या शिवाय कर्मचारी आणि व्यवस्थापन यांना कोठूनही ही प्रणाली वापरता येईल, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. अत्यंत सुलभ प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या अकाली निधी काढून घेण्याच्या प्रमाणात घट होईल, असा विश्वासही जॉय यांनी व्यक्त केला.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट